शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी ५० वर्षांपासून हाल होत आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर गुडघाभर चिखल होत असल्याने बैल- बारदाणा तसेच शेतीची अवजारे घेऊन मशागतीची कामे करण्यासाठी शेताकडे जाणे कठीण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत जात आहे.
दैठणा- सुमठाणा हा पाच किमीचा उदगीर-लातूर मार्गास जोडणारा सर्वात जवळचा रस्ता आहे. परंतु, पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होत आहे. पाऊस झाला की रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण होत आहे. त्यामुळे पेरणीनंतर मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बैलगाडी घेऊन जाणे कठीण होत आहे. गुडघाभर चिखलातून वाट काढताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जावे तरी कसे असा प्रश्न पडत आहे.
या रस्त्याचे अर्ध्यापर्यंतचे खडीकाम झाले आहे. परंतु, अर्ध्या रस्त्यावर केवळ मातीकाम झाले आहे. दैठणा-सताळा या रस्त्याचीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे शक्य होत नाही. ५० वर्षांपासून दैठण्याच्या शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी हाल होत आहेत. म्हणून या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांतून केली जात आहे.
पशुधनाची मोठ्या प्रमाणात हेळसांड...
गावातील बहुतांश शेतकरी, शेतमजुरांकडे गाय, म्हैस, शेळ्या आदी पशुधन आहे. परंतु, त्यांना पशुधन शेताकडे ने- आण करणे पावसाळ्यात शक्य होत नाही. त्यामुळे पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. अनेक शेतकरी पशुधन घरीच बांधून ठेवत आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
रस्त्याचे काम मंजुरीसाठी प्रस्तावित...
दैठणा- सुमठाणा या पाच किमीच्या रस्त्याचे काम व्हावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे ठराव पाठविण्यात आला असून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. कामाला मंजुरी मिळताच काम सुरू होईल, असे अभियंता तांदळे यांनी सांगितले.