किल्लारी : औसा- उमरगा राज्य मार्गाचे रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावरील किल्लारी ते लामजनापर्यंतच्या रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. सातत्याने दुरुस्ती करण्यासाठी एकेरी वाहतूक ठेवण्यात येत असल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
लातूर- उमरगा हा राज्यमार्ग असून या मार्गावरील औसा ते उमरगा या मार्गाचे महामार्गात रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचे खोदकाम करण्यात येऊन सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. किल्लारी ते लामजन्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे सुरुवातीस वाहनधारकांना दिलासा मिळाला; परंतु काही दिवसांनंतर या सिमेंट रस्त्यास भेगा पडत आहेत. त्या बुजविण्यासाठी संबंधितांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संबंधित ठिकाणी एकेरी वाहतूक ठेवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, औसा ते उमरगा या मार्गावरील एका ठिकाणचे पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अशा परिस्थितीत या सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने अपघात होण्याची भीती आहे. वास्तविक पाहता या मार्गावर सतत रेलचेल असते. त्यातच सिमेंट रस्त्याचे काम झाल्याने वाहनाची वेग मर्यादा वाढली आहे. मात्र, काही ठिकाणी डागडुजी सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे अनेकदा वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
२० ते २५ फूट लांबीचा रस्ता खोदला...
किल्लारी ते लामजना या सिमेंट रस्त्यावर जवळपास ५० ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधितांकडून २० ते २५ फूट अंतरापर्यंत जेसीबीने खोदकाम करण्यात येऊन पुन्हा दुरुस्ती करण्यात येत आहे. रस्त्याला तडे गेल्याने भरधाव वेगातील वाहनांचे अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दर्जेदार काम करावे...
या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सदरील मार्गाचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून करण्यात येत आहे.