शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून साकोळचा उल्लेख केला जातो. येथील ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या १७ आहे. या ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी ग्राम विकास पॅनल आणि भाजपाचे साकोळ विकास पॅनल यात लढत झाली होती. त्यामध्ये महाविकास आघाडीने १०, तर भाजपाच्या पॅनलला ७ जागा मिळाल्या होत्या.
सरपंचपदासाठी महाविकास आघाडीकडून कमलाकर मादळे यांनी, तर भाजपाच्या पॅनलकडून मधुकर कांबळे यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात महाविकास आघाडीचे कमलाकर मादळे विजयी झाले, तसेच उपसरपंचपदासाठी महाविकास आघाडीकडून राजकुमार पाटील यांनी, तर भाजपाकडून नवनाथ डोंगरे यांनी अर्ज दाखल केले होते. यात राजकुमार पाटील हे विजयी झाले.
यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी.बी. व्होटे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. हवा व तलाठी गणेश राठोड यांनी सहकार्य केले. यावेळी पो.नि. परमेश्वर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
सरपंचपदी मादळे, तर उपसरपंचपदी पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन कल्याणराव बर्गे, माजी सरपंच अब्दुल आजीज मुल्ला, निलंगा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधवराव शिंदे, राजेंद्र साकोळे, रमेश लुल्ले, राजकुमार बर्गे, संतोष महाजन, संजीव भुरे, महेश कवठाळे आदींची उपस्थिती होती.