भानामतीच्या संशयावरून मारहाण; अंनिसकडून निषेध
लातूर : भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वाणी (खुर्द) येथील चौकात घडली. सात वयोवृद्ध, महिलांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला असून, करणी, भानामती काही करता येत नाही. कालबाह्य थोतांड संकल्पना आहे. त्यामुळे मारहाण चुकीची आहे. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही अंनिसच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर जिल्हा प्रधान सचिव बाबा हलकुडे यांची स्वाक्षरी आहे.
लातूरला २१ टीएमसी पाणी देण्याचे वचन पाळण्याची मागणी
लातूर : महाराष्ट्रात मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून प्रसिद्ध आहे. उजनी धरणाचे पाणी कृष्णा व गोदावरी खोऱ्यातून लातूरसह मराठवाड्याला आणण्यासाठी भूमिपूजन केले होते. उजनी धरणातील पाणी लातूरला एक महिन्याच्या आत आणू, असे आश्वासन निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले होते. आता ते राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. पावणेदोन वर्ष झाले. अद्याप त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे जनतेला दिलेले वचन पाळावे, असे आवाहन माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
संपदा प्रकल्पाची नोंदणी आवश्यक
लातूर : शासनाच्या वतीने स्थावर संपदा कायदा पारित केला आहे. त्यातील सर्व कलमांची अंमलबजावणी मे २०१७ पासून करण्यात आली आहे. त्यानुसार वाणिज्यिक व रहिवासी स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. विकासासाठी प्रस्तावित आहे, त्याचे क्षेत्रफळ पाचशे चौरस मीटरपेक्षा अधिक नाही. याबाबतची संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय स्थावर संपदा प्रकल्पाची विक्रीची कारवाई नावनोंदणी करता येत नसल्याने नोंदणी आवश्यक आहे.
सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ
लातूर : आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान, संगणकाचे आहे. इंटरनेटच्या साहाय्याने जग एकमेकांशी जोडले गेले आहे. सामाजिक माध्यमे विकसित झाली असून, फेसबुक, गुगल, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्रॅम, ट्विटर आदी माध्यमे वाढली आहेत. जागतिकीकरणाच्या या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जागरूक राहण्याची गरज आहे, असे ॲड. छाया मलवाडे यांनी दयानंद महाविद्यालयात सांगितले. त्या सायबर सेक्युरिटी जागरूकता या विषयावर बोलत होत्या.