यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राेहित जगताप, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय अभियंता आर. के. पाटील, गटविकास अधिकारी अमाेल ताकभाते, तालुका कृषी अधिकारी काळे, मंडळ कृषी अधिकारी एच. एम. पाटील यांच्यासह महसूल, आरोग्य, पाेलीस, जलसिंचन, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
निलंगा तालुक्यात तेरणा व मांजरा नद्या वाहतात. या दोन्ही नद्यांचा संगम औराद - तगरखेडा शिवारात कर्नाटक सीमेजवळ होताे. गतवर्षी या भागात अतिवृष्टी हाेऊन पूर आला हाेता. साेनखेड बंधाऱ्याची दारे न उघडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या हाेत्या. याशिवाय नदीकाठच्या जमिनीवरील माती, पिके, जनावरे वाहून गेली हाेती. हाता-ताेंडाशी आलेली पिके पाण्यात तरंगत होती. आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आढावा घेतला.
पूर संरक्षण भिंत उभारावी...
जिल्हाधिकाऱ्यांनी तेरणा - मांजरा या दाेन नद्यांच्या बँक वाॅटरचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना व पूर संरक्षण भिंतीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देऊन साेनखेड येथे एका बाजूला लवकर माती भरण्यासही सांगितले. यावेळी त्यांनी साेनखेड, काेल्हापुरी बंधाऱ्याचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात रूपांतर, बांधकाम सुरू आहे त्याची पाहणीही केली.