येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने महिनाभर पाठ फिरविल्याने खरीपातील सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून रोगामुळे शेंगा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महागडी औषधे खरेदी करुन शेतकरी फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या आटोपल्या होत्या. पीकही चांगले उगवले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, त्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारल्याने माळरानावरील पिके वाळत होती तर सुपिक जमिनीवर पिके कोमेजून जात होती. मुग, उडिदाचे काही ठिकाणचे पीकं करपून गेले.
सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनवर उंटअळी, खोडमाशी, चक्री भुंगा आणि आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोवळ्या शेंगा सुकत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. परिणामी, तो हवालदिल झाला आहे. दरम्यान, येरोळ व परिसरात सोयाबीन पिकाची पाहणी कृषी विभागाचे अधिकारी सुभाष चोले, मोरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, कृषी पर्यवेक्षक बालाजी राजवाडे, कृषी सहायक एम.ओ. मोदी यांनी पहाणी करुन फवारणीसंदर्भात माहिती दिली.
कीड नाशकाची फवारणी करावी...
बहुतांश ठिकाणी सोयाबीन शेंगा लगडण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी करावी. तसेच सुरक्षित किट वापरावे. कृषी विभागाच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, कृषी सहाय्यक एम.ओ. मोदी यांनी सांगितले.