१ एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले आहेत. वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांतून ओरड होत असल्याने शासनाने १ एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दहा रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. गॅसचे दर कमी झाल्याचा देखावा करण्यात येत असला तरी यात निव्वळ चलाखी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गॅसवरील स्वयंपाकच बंद झाल्याचे चित्र आहे. पुन्हा चुली पेटल्या असून महिलांना धुराचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलानंतर गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने तुटपुंज्या उत्पन्नात घर कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सहा महिन्यात २२५ रुपयांनी महाग झाले गॅस...
सहा महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल २२५ रुपयांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ६२० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर डिसेंबर महिन्यात ७२० रुपयांना मिळत होता. डिसेंबर, जानेवारी २०२१ मध्ये हाच दर होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तब्बल १०० रुपयांनी वाढ होत सिलिंडर ८२० रुपयांवर पोहचला. मार्च महिन्यात ८४५ रुपयांना मिळत होता. १ एप्रिलपासून यात १० रुपयांनी दर कमी झाल्याने आता ८३५ रुपयांना मिळत आहे.
गॅसचे दर केवळ १० रुपयांनी कमी केले आहे. सहा महिन्यात २०० हून रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे बजेट कोलमडले आहे. सदरील दरवाढ तत्काळ मागे घ्यावी. - आश्विनी पांढरे, गृहिणी, लातूर
खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतरही बाबीसाठी खर्च लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - मनीषा नरवटे, गृहिणी, लातूर
महिन्याला गॅस सिलिंडर लागतो. सबसिडी भेटत होती, ती पण बंद झाली आहे. त्यामुळे दरवाढ मागे घेण्यात यावी. सहा महिन्यात २२० रुपयांची वाढ केली आणि केवळ १० रुपये कमी केले आहे. सर्वसामान्यांचा सरकारने विचार करायला हवा. - माधुरी हिंपळनेरकर, गृहिणी, लातूर