अहमदपूर : शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या पालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे होत्या. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, बाळासाहेब पाटील-आंबेगावकर, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक रवी महाजन, संदीप चौधरी, सय्यद ताजोद्दीन, डॉ. फुजेल जागीरदार, अभय मिरकले, सय्यद सरवर, अमित रेड्डी, सिद्धार्थ सूर्यवंशी, श्रीकांत उपाध्याय, सुनील डावरे, डी. के. जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर बागवान, अशिष तोगरे, युनुस गोलंदाज, मन्यार हुसेन, अरुण वाघंबर, दयानंद पाटील, नगर अभियंता हावगीराव ढोबळे, गुत्तेदार आर. एस. शेट्टी आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या विशेष योजनेंतर्गत होणाऱ्या या १० कोटींच्या व्यापारी संकुलात १४६ दुकाने असून, पहिल्या मजल्यावर ५४, दुसऱ्या मजल्यावर ५८, तिसऱ्या मजल्यावर ३४ व्यापारी सदनिका आहेत. हे काम १८ महिन्यात पूर्ण केले जाणार असून, त्यानंतर हे संकुल नगर परिषदेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर अमित रेड्डी यांनी आभार मानले.
विकासाचे राजकारण...
आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, आम्ही विकासाचे राजकारण करत नसून, नगरपालिका कोणत्या पक्षाची आहे, यापेक्षा कोण जनहिताचे काम करत आहे आणि त्यात अडचणी कोणत्या आहेत, हे पाहून त्या सोडविण्यासाठी मी स्वत: मदत करणार आहे. भविष्यात नगरपालिकेला विकासासाठी अधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.