पानगाव : पानगावसह परिसरातून राखेची ट्रकमधून होणारी अवैध वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रेणापूर तहसीलदारांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पानगाव व रेणापूर परिसरात वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी राखेची मागणी असल्याने ट्रक, हायवामधून राखेची खुलेआम वाहतूक केली जात आहे. पानगावातील रस्त्याची या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाऱ्यामुळे राख रस्त्यावर पसरत असून, दुकानात, हाॅटेल व घरामध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही राखेची वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रेणापूर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष वैभव कांबळे, ॲड. विठ्ठल खोडके, महासचिव आर. के. आचार्य, सुयोग आचार्य, कृष्णा वाघमारे, भरत मामडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.