सिकंदराबाद येथे सोमवारी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्यासोबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथील रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश अंबरखाने व सचिव मोतीलाल डोईजोडे यांची बैठक झाली. यावेळी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने या भागातील रेल्वे प्रश्नासंदर्भात मागण्या सादर केल्या. यावेळच्या चर्चेनंतर उदगीर- लातूर मार्गावरून आठवड्यातून तीन दिवस धावणारी हैदराबाद- पुणे ही रेल्वे नियमित करण्याचे आश्वासन देत रेल्वे महाव्यवस्थापक मल्ल्या यांनी हैदराबाद ते मुंबई ही बिदर-उदगीर-लातूर मार्गे नवीन गाडी सोडणे, परळी ते तिरुपती ही लातूर रोड-उदगीर-बीदर मार्गे ही नवीन गाडी सुरू करणे व हैदराबाद- बिदर इंटरसिटी एक्स्प्रेस लातूरपर्यंत विस्तारित करण्याच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारामुळे यापूर्वी मध्य रेल्वे व आता दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकासोबत बैठका होऊन या भागातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेग आला आहे. आगामी काळात अनेक नवीन गाड्या या मार्गावरून धावण्यासाठी रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.