लातूर : कडक निर्बंध लागू करताना राज्य शासनाने परवानाधारक ऑटोचालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली असली तरी अद्याप पदरात काहीच नाही. यामुळे जिल्ह्यातील ८ हजार ६२ परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.
आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याची सूचना सोडली तर अद्याप मदतीबाबत कसलाच निर्णय झाला नसल्याने रिक्षा चालकांमध्ये शासन खात्यावर कधी जमा करते, याची प्रतीक्षा आहे. सध्या शहराअंतर्गत मर्यादित स्वरूपात प्रवासी वाहतूक करण्यास रिक्षा चालकांना परवानगी असली, तरी कडक निर्बंध असल्याने कोणी घराबाहेर पडत नाही. त्यामुळे प्रवासीच मिळत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आहे. शासनाने दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु, ती कधी मिळेल याचा पत्ता नाही. आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करून मदत आज, उद्या मिळेल या आशेवर रिक्षाचालक आहेत. बिगर परवानाधारकांचा तर प्रश्नच नाही.
दिल्ली सरकारने दुसऱ्यांदा रिक्षा चालकांना मदत केली आहे. आंध्र, कर्नाटक सरकारनेही मदत केली आहे. आपल्या सरकारने केवळ घोषणा केलेली आहे. आम्ही रिक्षाचालक शासनाची मदत कधी मिळेल, याची वाट पाहत बसलो. अद्याप काहीच निर्देश नाहीत.
- त्रिंबक स्वामी
घोषणा करून महिना होत आहे. मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठविला होता. त्याचे उत्तर मिळाले असून, शासनाने जाहीर केलेली मदत लवकरच मिळेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत.
- मच्छिंद्र कांबळे
परवानाधारक रिक्षा चालकांना शासनाने दीड हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. केलेल्या घोषणेनुसार तत्काळ मदत द्यावी. सध्या हाल सुरू आहेत. ऑटोत दोन प्रवासी घेऊन वाहतूक करण्यास मुभा आहे. परंतु, प्रवासीच नाहीत. त्यामुळे उपासमार आहे. शासनाने उपासमार टाळण्यासाठी जाहीर केलेले दीड हजार तत्काळ द्यावे. - सुरेश शिंदे