वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेकांचे पत्रे उडून गेले आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने उन्हामुळे उकाडा होता. आता थंड झाला आहे. लोकांनी आता चांगला श्वास घेतला आहे.
दुपारी पावणेतीनच्या दरम्यान आकाशात मोठमोठे ढग आले. विजेचा कडकडाट सुरू झाला. जळकोट शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे होते. विजेचा कडकडाट होता. जळकोट, हळदवाढवणा, पाटोदा बुद्रुक, कुणकी, कोळनुर, जाम दापका, राजा हिपरगा याठिकाणी मोठा पाऊस मेघगर्जनेसह पडला. शेतकरी आपल्या शेती मशागतीचे काम करण्यासाठी जात आहेत. शुक्रवारी पावसामुळे कामात व्यत्यय आला असून दुपारनंतर शेतकरी आपल्या गुरांसह घरी गेले. गेल्या अनेक दिवसांपासून जळकोट शहरात पाइपलाइन फुटल्याने व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांनी पत्र्यांवरील पाणी जमा केले असून टंचाईत त्यांना दिलासा मिळाला आहे.
झाडे उन्मळली, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू...
अतनूर- पाटोदा खुर्दसह अनेक भागांत वादळाने झाडे आडवी पडली आहेत. तर, अनेक घरांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अतनूर येथील कोंडिबा जाधव यांच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, बालाजी केंद्रे, सुरज गीते म्हणाले, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी.