राजकुमार जाेंधळे
लातूर : साेशल मीडियाच्या माध्यमातून महिलांसह मुलींचा छळ हाेत असल्याचे समाेर आले असून, त्यांना ट्राेल करुन मानसिक त्रास दिला जात आहे. अनेकदा मेसेंजर, इन्टाग्राम, व्हाॅट्सॲप आणि फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचा, ओळखीचा गैरफायदा घेत सलगी, जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला जाताे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास पाठलाग करणे, अश्लील मेसेस पाठविण्याचे प्रकार घडतात. यातून केवळ त्रास देण्याचीच विकृत मानसिकता असल्याचे दिसून आले आहे. महिला आणि मुली कुटुंबात, समाजात बदनामी हाेईल, या भीतीपाेटी तक्रार देण्यास समाेर येत नाहीत. यातून छळणाऱ्यांचे मनाेबल वाढते. महिला, मुलींनी धाडस करुन पुढे आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करणे शक्य आहे.
तक्रार करणाऱ्यांची संख्या अधिक...
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही महिला, मुली हाेणारा छळ मुकाटपणे सहन करतात. याला राेखण्यासाठी कायद्याचा आधार घेत कारवाईची गरज आहे.
महिला, मुलींना अजूनही बदनामीची मनात भीती वाटते. यातूनच आराेपींचे फावते आणि ते माेकाटपणे समाजात वावरत असतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी धाडस केले पाहिजे.
महिलांचे काेट...
साेशल मीडिया ही सर्वांसाठी अभिव्यक्त हाेण्याची हक्काची जागा आहे. एखाद्या पाेस्टवर काही मंडळी विनाकारण महिलांना ट्राेल करतात. अश्लील मेसेस व्हायरल करतात. यातून महिला, मुलींना अपमानित झाल्यासारखे वाटते. हे थांबण्याची गरज आहे.
- अश्विनी लातूरकर, उदगीर
साेशल मीडियावर पाठलाग करुन महिला, मुलींचा छळ केला जात असल्याचे समाेर आले आहे. याविराेधात कायदेशीर आधार घेत कारवाई करण्याची गरज आहे. सायबर सेलकडे धाव घेतली तर न्याय मिळवता येताे.
- माधुरी हिप्पळनेरकर, लातूर
साेशल मीडियातून आधी मैत्री, ओळख आणि नंतर अधिक जवळीकता साधणे हे पुन्हा अडचणीचे ठरते. अशावेळी समाेरील व्यक्ती महिला आणि मुलींचा एकप्रकारे पाठलाग करताे. शेवटी संपर्क बंद केला तर पुन्हा अश्लील मेसेज, ट्राेलच्या माध्यमातून छळ करताे. अशांवर कारवाई झाली पाहिजे. यासाठी पाेलिसांची मदत घ्यावी.
- डी. व्ही. गीते, भराेसा सेल, लातूर
येथे करा तक्रार...
१ साेशल मीडियावरुन महिला, मुलींचा छळ हाेत असेल तर त्यांनी जवळच्या पाेलीस ठाण्यात तक्रार द्यावी.
२ साेशल मीडियावरुन फसवणूक, छळ झाल्यानंतर पाेलीस अधीक्षकांकडे तक्रार केली तर न्याय मिळण्याची आशा आहे.
३ महिलांनी भराेसा सेल अथवा सायबर सेलकडेही तक्रार करावी, त्यांना तातडीने मदत मिळेल.