तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, औसा शहर व परिसरात दुपारी ४ वा. च्या दरम्यान अचानक वादळी वा-यासह गारांचा तासभर जोरदार पाऊस झाला. तसेच गाराही पडल्या. त्यामुळे आंबा, द्राक्षे व फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू,ज्वारीबरोबरच जनावरांचा कडबाही भिजला आहे. तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याचे तहसीलदार शोभा पुजारी यांनी सांगितले.
वीज पडून म्हैस दगावली...
किल्लारी परिसरातील वाणेवाडी येथे सोमवारी दुपारी २ ते ३ वा. च्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात जाेराचा पाऊस झाला. दरम्यान, वाणेवाडी येथील सिद्धेश्वर बाळापुरे यांनी शेतातील झाडाखाली दोन बैल, गाय, दोन वासरे व दोन म्हशी बांधल्या होत्या. यावेळी वीज पडून एक म्हैस दगावली आहे. तलाठी पवार यांनी पंचनामा करुन तहसीलदारांना कळविले आहे.