बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अवैधरीत्या ट्रकमधून गुटखा आणण्यात येत असल्याची माहिती निलंगा पोलिसांना मिळाली. त्यावरून निलंग्याचे पोलीस उपनिरीक्षक जी.जी. क्षीरसागर, पोना प्रणव काळे, शीतलकुमार शिंदाळकर, निकमसिंह चव्हाण, एएसआय अशोक ढोणे, दीपक थोटे, मरपल्ले यांनी उदगीरमोडजवळ सापळा रचला. तेव्हा येत असलेल्या ट्रकला थांबवून तपासणी केली. त्यात ३३ पोती गुटखा आढळून आला. त्याची किंमत २७ लाख २२ हजार ५०० रुपये आहे. हा गुटखा जप्त करून ट्रकही ताब्यात घेतला. ट्रकची किंमत १० लाख रुपये आहे. गुरुवारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन पंचनामा केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक रुक्मोद्दीन इमाम इनामदार (जि. गुलबर्गा) यास पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी.जी. क्षीरसागर हे करीत आहेत.