राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीस पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर गुरुवर्यांच्या पादुकांचे तीर्थ घेऊन भक्तांनी गुरुराज माउली व शंकरा हरा या भजनात माउलींच्या पादुकांची मिरवणूक काढली. यावेळी भक्त मंडळींची माेठी उपस्थिती होती. कीर्तन सेवा मोहन कावडे गुरुजी यांची संपन्न झाली. यावेळी आचार्य स्वामी व उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले. गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या भक्तांना शिवकुमार घंटी, भगवान डोंगरे, काशिनाथ दांडगे यांनी अन्नदान केले. तोंडार व नांदेड भजनी मंडळाने अन्न सेवेत सहभाग नोंदविला. अहमदपूर आगारातून विशेष बससेवा तसेच एक कंट्रोल पॉईंट ठेवण्यात आला होता. महामार्गावरील बसेसकडून भक्तांना सुविधा देण्यात येत होती. आगार व्यवस्थापक शंकर सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरु सर्व तीर्थांचे सार...
आचार्य स्वामी यांनी प्रवचनात गुरु हा सर्व तीर्थांचे सार आहे. तो कोणत्याही क्षेत्रातील असेल. जन्मत: आई- वडील आपले गुरू असतात. शिक्षण देणारे शिक्षक आपले गुरु आहे. राष्ट्रसंत सद्गुरूंचे आपण सर्व भक्त आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे आणि कायमस्वरूपी आपण त्यांनी दिलेल्या आचार, विचारानुसार आचरण केले पाहिजे.
दिंड्यांचे आगमन...
गुरुवारपासूनच भक्ती स्थळावर गावोगावच्या दिंड्या येत होत्या. तोंडार, चवळेवाडी, उदगीर, वाढवणा, किनगाव, किनी, पाखरसांगवी येथील दिंड्या दाखल झाल्या, तसेच दुचाकीवर भक्त दाखल होत होते. यावेळी शिभप भगवंतराव चाभंरगेकर पाटील, शिवराजअप्पा नावंदे, शिभप मोहन कावडे हासनाळकर, शिवलिंग पाटील किनीकर, दिंडी प्रमुख मन्मथ पालापुरे, विश्वनाथ स्वामी, बालाजी पाटील येरोळकर, रतिकांत स्वामी तोंडार, चंद्रकांत हैबतपुरे, वैजनाथ मुरूडे, किनीकर, विठ्ठलराव जाकापुरे, रमेश वांजरखेडकर, लक्ष्मण चवळे तसेच माजी आमदार विनायकराव पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, राजकुमार मजगे, होनराव, कमलाकर पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, कीर्तनकार, गायक, वादक उपस्थित होते.