उदगीर : तब्बल नव्वदी ओलांडलेल्या आजीबाईंना अचानक तीव्र ताप आला. अशक्तपणामुळे जेवण कमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या नातवाने खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी कोविड टेस्ट करायला सांगितली. त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि सुरू झाली धावपळ व घबराट. मात्र मोठ्या धैर्याने आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे.
उदगीर येथील लक्ष्मीबाई अप्पाराव शेटे (९०) यांना १९ एप्रिल रोजी अचानक तीव्र ताप आला. त्यामुळे त्यांचे नातू माधव शेटे यांनी त्यांना उदगीरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले; पण डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला अन् घरात एकच धांदल उडाली. आजीला कोरोना झाला म्हणून....
कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे प्रश्न पडला. उदगीरमध्ये तर कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. सरकारी दवाखान्यात जागा नाही, मिळाली तर वयोवृद्ध रुग्णांकडे तपासणी करण्यास जवळपास दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. मग त्यांचे नातू माधव शेटे यांनी प्रभागातील नगरसेवकांची परवानगी घेऊन गृहविलगीकरण करून आम्ही उपचार करू म्हणून रीतसर परवानगी घेतली. तेव्हा दवाखान्यात नेण्यासाठी अनेक ऑटोंना हात केले; पण एकही वाहन थांबले नाही. अखेर नातवाने त्यांना मोटारसायकलीवरून नेण्याचे ठरविले. आजीला कसेबसे गाडीवर बसविले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणातील एका खोलीत ठेवले. लक्ष्मीबाई शेटे यांचे वय ९० वर्षे ओलांडल्याने अशक्तपणा जास्त होता. गोळ्या, औषधे खाण्यासाठी त्या प्रतिसाद देत नव्हत्या; पण नातू माधव यांनी आजीबाईची नजर चुकवून गोळ्या जेवणातून दिल्या. वेळोवेळी औषधोपचार केले. केवळ दहाव्या दिवशी आजीबाई ठणठणीत झाल्या व त्यांनी कोरोनाला उंबरठ्यावरूनच हाकलले.
मन धीट करा...
कोरोनासारख्या आजाराला घाबरायचे नाही. आपण आपले मन धीट ठेवले पाहिजे. कोणताच आजार जवळ येत नाही. आला तर त्याला रोखण्यासाठी मन धीट केले पाहिजे, असे कोरोनामुक्त झालेल्या लक्ष्मीबाई शेटे यांनी सांगितले.