निलंगा तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून या गावातील स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याचे बिल यापूर्वी शासन भरत होते. १४ वा वित्त आयोगातील जमा रकमेतून गावाच्या विकास कामासाठी निधी खर्च केला जात असे. मात्र आता ग्रामविकास खात्याच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद मार्फत आदेश काढण्यात आले असून, स्ट्रीट लाईटचे बिल व पाणीपुरवठ्याचे बील पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून भरण्यात यावे. या निर्णयामुळे गावाच्या विकास कामावर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच यांनी केला असून, हा आदेश मागे घ्यावा व पूर्वीप्रमाणे राज्य शासनानेच ही बिले भरावी अशी मागणी सरपंच परिषद शाखा लातूरच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हा समन्वयक विजय सोळुंके, सरपंच ओम गिरी, सरपंच परमेश्वर गोरे, विजय वडजे, सरपंच अरुणा गोविंद जाधव, सोनाबाई परमेश्वर सोळुंके, अनिता रामभाऊ धुमाळ आदीसह सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामपंचायत सरपंचांचे गटविकास अधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST