पिरूपटेलवाडी हे १५०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिका-यासह ग्रामसेवकास जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीत बसावे लागत आहे. विशेष म्हणजे, ही शाळा गावापासून दूर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार जुन्या भिंतीच्या खोलीतून होत होता. मात्र, ती पूर्णत: ढासळली आहे. त्यामुळे बसण्यासाठी जागा नाही. जुन्या ग्रामपंचायतीची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
शाळेत विद्युत सुविधा नाही. तसेच ती डोंगरात असल्याने भीती व्यक्त होत आहे. गावामध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतीची निर्मिती झाल्यास नागरिकांची सोय होणार आहे, असे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी सांगितले.
गावातील जुन्या ग्रामपंचायतीची खोली पडलेली आहे. तिथे नवीन इमारत बांधण्यात यावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे उपसरपंच राजेंद्र गायकवाड म्हणाले.