लातूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून, खाद्यतेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शासनाने काटकसर सुरू केली असून, पूरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. परिणामी, लाभार्थ्यांना चार महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी एक किलो साखर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, हा बदल करताना प्रथिने, कॅलरीज मिळत असले तरी पोषण आहाराला खाद्यतेलाविनाच फोडणी द्यावी लागत आहे.
पूरक पोषण योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ३०५ लाभर्थी आहेत. यामध्ये सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील ६५ हजार ९८१, तीन महिने ते सहा वर्षे वयोगटातील ८१ हजार ९८१, तर १३ हजार ५९३ गरोदरमाता आहेत, तर १३ हजार ७४१ स्तनदा माता असून, लॉकडाऊनच्या काळातही घरपोच कोरडा शिधा दिला जात आहे. दरम्यान, दिवसेंदिवस महागाई वाढत असून, खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर दिली जात असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
फोडणी कशी द्यायची
गेल्या चार महिन्यांपासून तेलाऐवजी साखर दिली जात आहे. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शासनाने गरोदर माता आणि स्तनदा मातांचा विचार करून नियमितपणे अर्धा लिटर तेल पूर्वीप्रमाणे द्यावे.
- अनिता कांबळे
पूरक पोषण आहारामध्ये बदल करण्यात आल्याने तेलाऐवजी साखर मिळत आहे. कोरोनामुळे आधीच लॉकडाऊन आहे. त्यात आर्थिक उत्पन्न नाही. कोरडा शिधा मिळत होता. त्यातही आता तेल गायब झाले आहे.
- वैष्णवी शिंदे
लहान मुलांना पोषण आहार दिला जात आहे. मात्र त्यामध्ये आता तेल बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. शासनाने याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असून, लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच तेल द्यावे. म्हणजे गैरसोय दूर होईल.
- ऋषिकेश कांबळे
शासनाच्या निर्णयानुसार वाटप
चार महिन्यांपासून शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत आहे. सदरील साहित्याचे नियोजितपणे वाटप केले जात आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारी नाहीत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच लाभार्थ्यांना पूरक पोषण आहाराचे साहित्य पोहोच केले जात आहे. यासाठी कोरोना नियमांची पुरेपूर अंमलबजावणी केली जात आहे.
- देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पूरक पोषण आहार योजना
एकूण लाभार्थी १,७५,३०५
६ ते ३ वर्षे वयोगट लाभार्थी : ६५,९८९
गरोदर महिला : १३,५९६
स्तनदा माता : १३७४१
वितरण करताना नियमांचे पालन
जिल्ह्यात जवळपास १ लाख ७५ हजार ३०५ लाभार्थी आहेत. त्यांना सकस आहार मिळावा आणि सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने पूरक पोषण आहार दिला जातो. यामध्ये गहू, तांदूळ, मूग दाळ, हरभरा डाळ, मीठ, हळदी, मिरची आणि गोडतेलाचा समावेश होता. मात्र आता गोडतेल पूरक पोषण आहारातून गायब झाले आहे.