लोकमत न्यूज नेटवर्क
चाकूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्याप्रकारे काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांनी येथे दिले. शिवसेनेचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा. शिवसेना नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी सेना आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
चाकूर येथे आयोजित शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, डॉ. शोभा बेंजरगे, माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, तालुकाप्रमुख गुणवंत पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक यांनी लातूर जिल्ह्यात शिवसेना अत्यंत कार्यक्षमपणे काम करत असून, गावोगावी शाखा स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. शिवसेना ही आगामी काळातील निवडणुकीत नेत्रदीपक यश प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतोष सोमवंशी, सुनीता चाळक, डॉ. शोभा बैंजरगे, सुभाष काटे, गुणवंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाप्रमुख गुणवंत पाटील यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच शिवसेनेच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन गावागावात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा जागर मांडला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून देवंग्रा येथील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा शिंदे, बालाजी नरवाडे, अक्षय औसेकर, मधुसूदन शिंदे, कृष्णा चव्हाण, दुर्गेश निकम, सोपान जाधव यांनी तालुकाप्रमुख गुणवंत पाटील व नळेगाव विभागप्रमुख दत्ता नरवाडे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.