अहमदपूर : अस्वच्छता, दुर्गंधीमुळे विविध आजार उद्भवतात. त्यामुळे गाव व गावचा परिसर स्वच्छ रहावा म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्याचा नागरिकांनी वापर करावा म्हणून विविध प्रयत्न करण्यात आले. याशिवाय, सकाळच्या वेळी उघड्यावर प्रातर्विधीसाठी जाणा-यांना रोखण्यासाठी गावोगावी गुडमॉर्निंग पथके नियुक्त करण्यात आली. परंतु, सध्या ही पथक गायब असल्याने ग्रामीण भागातील नागरिक शौचासाठी उघड्यावर जात असल्याचे दिसून येत आहे.
कुठलाही आजार हा अस्वच्छतेमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता रहावी तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच घरोघरी शौचालय बांधण्याकरिता अनुदान देण्यात आले. त्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले. परंतु, सध्या बहुतांश नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करीत नसल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
स्वच्छता अभियानच्या सुरुवातीच्या काळात सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना रोखण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. परिणामी, नागरिक शौचालयाचा वापर करीत होते.
परंतु, स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने उघड्यावर प्रात:विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गुडमॉर्निंग पथक स्थापन करावेत आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या अनुदानातून तालुक्यातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. परंतु, त्याचा वापर होत नाही. सध्या तालुक्यात डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतींनी गुड मॉर्निंग पथक स्थापन करणे गरजेचे ठरत आहे.
स्वच्छतागृहात भंगार साहित्य...
वैयक्तिक शौचालयासाठी शासनाकडून लाभार्थ्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात आले. हे अनुदान मिळविण्यासाठी काहींनी स्वच्छतागृहाच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारल्याचे दाखवून अनुदान मिळविले आहे. तसेच काहीजण शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर हा भंगार साहित्य, जळतण ठेवण्यासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामसेवकांना सूचना करु...
ज्या गावातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत, त्या गावातील ग्रामसेवकांना सूचना करण्यात येईल. गावात तात्काळ गुड मॉर्निंग पथक स्थापन करून कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या जातील, असे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांनी सांगितले.