जळकोट तालुक्यातील घोणसी परिसरात वाडी-तांड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना प्रथमोपचारासाठीही जळकोट अथवा उदगीरला जावे लागते. वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याने घोणसी परिसरातील रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सतत परवड होत असे. ही समस्या जाणून घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे महिनाभरापासून सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे गुरुवारी घोणसीला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आल्याचे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव प्र. मो. बलकवडे यांनी काढले आहे.
घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन दत्ता घोणसीकर, दीपक आंब्रे, उमाकांत डावळे, सोमेश्वर परके, बालाजी जानतिने, माजी उपसभापती भरत मालुसरे यांनी राज्यमंत्री बनसोडे यांचे आभार मानले. या आरोग्य केंद्रामुळे घोणसी व परिसरातील धोंडवाडी, गुत्ती, सुल्लाळी, डोंगरगाव, डोंगरकोनाळी, एकुरका, बोरगाव, तिरुका, कमलवाडीसह वाडी-तांड्यातील रुग्णांना लाभ होणार आहे.
विकासासाठी सदैव कटिबद्ध...
‘विशेष बाब’ म्हणून घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी राज्यमंत्री बनसोडे यांनी घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. महिनाभरातच आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, मी जनतेचा सेवक म्हणून कर्तव्य करत आहे. जळकोट तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे. आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर आपला भर आहे.