लातूर : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती गॅसच्या दरात वाढ सुरूच असून, आता गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी ८६० रुपयांना मिळणारा गॅस ८८५ रुपयांवर पोहोचला असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. परिणामी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, दरवाढ मागे घेण्याची मागणी होत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या हातचे काम गेले, तर अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यातच दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात गॅसच्या दरात १८५ रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ७०० रुपयांना घरगुती गॅस मिळत होता, त्याचा दर आता ८६० रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून, दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
आठ महिन्यात १८५ रुपयांची दरवाढ...
जानेवारी - ७००
फेब्रुवारी - ७२०
मार्च - ८३५
एप्रिल - ८४५
मे - ८४५
जून - ८४५
जुलै - ८६०
ऑगस्ट - ८८५
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच...
काही वर्षांपूर्वी गॅसवर १५० रुपयांची सबसिडी मिळायची ती आता बंद झाल्यात जमा आहे.
केवळ ६ रुपये गॅस भरल्यानंतर सबसिडीमध्ये जमा होत आहे. त्यामुळे सबसिडी बंद, दरवाढ सुरूच असे चित्र आहे.
कोरोनामुळे आर्थिक बजेट कोलमडलेले असताना वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे.
शहरात चुली कशा पेटवायच्या...
वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाल्याने बजेट कोलमडले आहे. शासनाने दरवाढ कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.
- शुभांगी साळुंके, गृहिणी
गेल्या आठ महिन्यात गॅसच्या दरात १८५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न आहे. आता काही दिवसांपूर्वी ८६० रुपयांना मिळणारा गॅस ८८५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दरवाढ कमी करण्याची गरज आहे.
- रेखा शिंदे, गृहिणी
दरवाढीमुळे जगणे अवघड...
कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर संकट आले आहे. त्यातच महागाईमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुलांचे शिक्षण, फीस आणि घरगुती खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाने दरवाढ कमी करण्याची गरज आहे.
पेट्रोल, डिझेल आणि आता घरगुती गॅसच्या किंमती वाढतच आहेत, त्या कमी होण्यासाठी काहीच उपाययोजना राबविल्या जात नाहीत.
दरवाढ तत्काळ कमी करून सर्वसामान्यांना शासनाने दिलासा देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
व्यावसायिक गॅस ४ रुपयांनी स्वस्त...
घरगुती गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली असली तरी व्यावसायिक गॅसच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. सध्या कोरोनामुळे अनेक समारंभ बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसच्या मागणीतही घट झाल्याचे चित्र आहे.