शहरात ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत आहे. आवक स्थिर असल्याने दरही कमी आहेत. टोमॅटो, वांगे, मिरची, लसूण, कोबी, पालक, शेपू, मेथी यासोबतच विविध भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत आहे. दरम्यान, काेरोनामुळे खरेदीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद असल्याने अनेक व्यापारी, किरकोळ विक्रेते शहरातील विविध भागात हातगाडीद्वारे भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. दरम्यान, घरपोच भाजीपाला मिळत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
लातूर : ग्रामीण भागातील प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या संचारबंदी लागू असल्याने एसटीच्या प्रवासी सेवेला अल्प प्रतिसाद आहे. मात्र, संचारबंदी शिथिल झाल्यानंतर बससेवा पूर्ववत होईल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीला प्रतिसाद मिळेल. पावसाळा काही दिवसांवर आला असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसथांब्याची ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कृषी विभागाच्या वतीने पेरणी प्रात्यक्षिक
लातूर : खरीप हंगामाला काही दिवसात सुरुवात होणार असून, कृषी विभागाच्या वतीने पेरणी प्रात्यक्षिक, घरगुती बियाणांचा वापर याविषयी माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात जवळपास ५ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित असून, यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात ६ लाख हेक्टरहून अधिक प्रस्तावित क्षेत्र आहे. दरम्यान, शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून, लवकरच पेरणीपूर्व कामे पूर्ण होतील.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच काही ठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी केली जात आहे. लातूर शहरातील गांधी चौक, रेणापूर नाका, गंजगोलाई, बार्शी रोड, पाच नंबर चौक, दयानंद गेट परिसर आदी ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.