तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या विशेष दुरुस्ती करण्याची मागणी मंगरूळचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.
या दोन्ही कालव्यांची विशेष दुरुस्ती झाल्यास मंगरूळ, लाळी खु., लाळी बु., बेळसांगवी, येवरी, वाढवणा खु., वाढवणा बु., बोरगाव, शिवणखेड आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी महेताब बेग यांनी केली होती. त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली होती. तेव्हा तिरु प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव, वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा प्रस्तावावर अभ्यास करण्याबरोबर सर्वेक्षण, अंदाजपत्रकाची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सर्व बाबींचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील कामास सुरुवात करण्यात येईल, असे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
जळकोट येथे सिंचन विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे. या दोन्ही कालव्याचे काम सुरू झाल्यास सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच पिण्याच्या पाणी सोय होण्यास मदत होईल. जमिनीतील पाणी पातळी वाढेल. या बाबींचा विचार करून या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व सरपंच महेताब बेग यांनी सांगितले.