अहमदपूर : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावे, या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान, हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे शिवभोजन थाळीचा तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. सध्या शासनाच्या वतीने मोफत शिवभोजन दिले आज असून, त्याचा अहमदपुरात ३५० जणांना लाभ होत आहे. त्यामुळे गरजूंची भूक भागविली जात आहे.
गरजू नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना महाविकास आघाडीच्या सरकारकडून एप्रिल २०२० पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेचा प्रारंभ जिल्हा व मोठ्या शहरांमधून करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचे संकट सुरू होताच ही योजना तालुकास्तरावर राबविण्याचे नियोजन करून तालुक्याच्या ठिकाणीही शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. १० रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशावेळी लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर शहरात तीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज ३५० थाळी तालुक्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. गरजूंना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ब्रेक द चेनची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने या कालावधीत असे हाल होऊ नयेत म्हणून शिवभोजन थाळी पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार १५ एप्रिलपासून एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अहमदपुरात तीन केंद्र...
शासनाकडून एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. शहरातील तीन केंद्रांतून ३५० शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. शिवभोजन थाळी केंद्रचालकांनी मोफत थाळीचे वाटप करावे. गरजू लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार डी.के. मोरे यांनी केले आहे.