उदगीर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शहरात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे. या रूग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईक व आप्तेष्टांची लॉकडाऊनमुळे राहण्याची व जेवणाची अडचण होत होती. ही बाब येथील श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या लक्षात आल्याने येथील शिवाजी महाविद्यालयात रूग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व दोनवेळच्या जेवणाची माफत सोय करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने पसरत असून, ग्रामीण भागात ही रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोनाबाधित रूग्णांसोबत नातेवाईक व आप्तेष्टही रूग्णसेवेसाठी शहरात मुक्कामी राहत असल्याने त्यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती. ही बाब येथील सामाजिक जाण असणाऱ्या श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या निदर्शनास आली. यावर तत्काळ अमलबजावणी करून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी महाविद्यालयात रूग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. या सेवेचा दररोज ५०पेक्षा अधिक जण लाभ घेत आहेत. यासाठी शहरातील अनेक दानशूर मंडळीही पुढे येत आहेत. या उपक्रमासाठी मदत करण्याची इच्छा असेल तर गोपाळ मुक्कावार, प्रशांत मांगुळकर, मनोज खत्री, आशिष अंबरखाने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.