शहरातून जाणाऱ्या महामार्गावर छत्रपती चौक ते गरुड चौक दरम्यान पूर्वीच्या प्रस्तावाप्रमाणेच नव्याने उड्डाण पुलाचे नियोजन करावे. त्यासाठी केंद्र सरकार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
रस्त्यांचा डीजिटल सर्वे... जिल्ह्यातील गाव रस्ते, जिल्हा रस्ते, अंतर जिल्हा रस्ते तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गांचा डीजिटल सर्वे करून त्याची एकत्रित माहिती मिळणारा डिस्ट्रीक्ट रोड डॅश बोर्ड तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या एकत्रित बैठकीत दिल्या. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे मोठे आहे. एखाद्या रस्त्याची दुरुस्ती वारंवार होते. तर काही रस्त्यांची दुरवस्था वर्षानुवर्षे असते. हा प्रकार टाळण्यासाठी एकत्रित डॅश बोर्ड तयार करावा.
लातूर शहरातील लोकनेते विलासराव देशमुख मार्गाचे सुशोभिकरण, विद्युतीकरण तसेच शहरातील सर्व चौकांचे सुशोभिकरण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.