शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून परिसरातील १५ गावांना घरगुती आणि शेतीपंपांना विद्युत पुरवठा होतो. गुरुवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास अचानक दाब वाढल्यामुळे ट्रान्सफार्मरवर ठिणग्या पडल्याने ट्रान्सफार्मरने पेट घेतला. ट्रान्सफार्मरमध्ये असलेल्या ऑईलमुळे भडका उडाल्याने आग आणि धुराचे लोट पसरले. दरम्यान, तेथील ऑपरेटरने संबंधित कार्यकारी अभियंत्यांस माहिती देऊन उदगीर, लातूर आणि निलंगा येथील अग्निशमन दलास पाचारण केले. या तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आगीत अंदाजे साठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
दरम्यान, घरगुती वीज पुरवठा शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होईल. शेती पंपाच्या विजेसाठी दोन दिवसांचा अवधी लागेल, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी सांगितले. यावेळी निलंगा येथील कार्यकारी अभियंता ढाकणे, शिरूर अनंतपाळ येथील उपकार्यकारी अभियंता जोंधळे, साकोळ येथील कनिष्ठ अभियंता जावळे, अभियंता नागराळे, कार्यकारी अभियंता डी.बी. बिराजदार, राजकुमार कत्ते, अभियंता पी.एन. दुधाळे, पी. यू. हुडे यांची उपस्थिती होती.
धुराच्या लोटामुळे नागरिक भयभीत...
येरोळ येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रास आग लागून आगीचा लोळ आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिक भयभित झाले होते. उदगीर, लातूर आणि निलंगा येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.