पानगाव : यावर्षी खताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ रद्द करण्यात यावी तसेच खत, बियाण्याचा काळाबाजार होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. काही विक्रेते जुन्या शिल्लक खताची नवीन दरात विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यासाठी ते कच्च्या पावत्यांचा वापर करत आहेत. ई-पाॅस मशीनवरील खत साठा व प्रत्यक्षातील खत साठ्यात तफावत आहे. सध्या महाबीजचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने ते कोणत्या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे, याची माहिती कृषी विभागाने द्यावी. तसेच अनुदानावरील बियाणे पेरणीपूर्वी वाटण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. या निवेदनावर संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, संजय राठोड, बाळासाहेब मुंडे, संग्राम रोडगे, बाळासाहेब शिवशेटे, नीलेश शिंदे, आदींच्या सह्या आहेत.
खतांच्या दरातील वाढ तत्काळ रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST