औसा मतदारसंघातील अनेक गावांत शेतरस्ते कामास सुरुवात झाली आहे. तालुक्यात १२० व मतदारसंघातील निलंगा तालुक्यात ३० कि.मी. लांबीच्या अंतराचे शेतरस्ते कामाचे मातीकाम व दबई काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत, असे सांगून आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपला स्थानिक विकास निधी शेवटचा शेतरस्ता होईपर्यंत समर्पित केला जाईल. पहिल्या टप्प्यात ६१ गावांतील रस्त्याची कामे हाती घेतली असून, ८८५ कि.मी. अंतराचे शेतरस्ते प्रस्तावित आहेत. शेतरस्त्यांअभावी शेतमाल पिकवून शेतकऱ्यांना शेतात ठेवावे लागत आहे. प्रत्येक शेताला रस्ता झाल्यास शेतमालाची वेळेत ने-आण करणे, रास वेळेत होणे, शेतीची कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. शेतरस्त्यांमुळे शेतीच्या किमतीत वाढ होईल. शेतीमालाची वाहतूक वेळेत करुन बाजारपेठेत आणता येणार असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. शेतरस्त्याची कामे पूर्ण झालेल्या रस्त्यावर माती कामानंतर मनरेगातून खडीकरण हाती घेण्यात येईल. पाणंद, शेतरस्ते व शिवरस्ता कामासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था हे २० ते २५ पोकलेन मशीनची मदत करणार असल्याचे सांगून शेतरस्ते कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासन कायदेशीर कारवाई करून शेतरस्ते मोकळे करून देईल. मतदारसंघात या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, गटनेते सुनील उटगे, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. भीमाशंकर राचट्टे, प्रा. शिव मुरगे, फहीम शेख आदी उपस्थित होते.
शेतरस्त्यांची संकल्पना पूर्णत्वास आल्यास शेतकरी समृद्ध होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST