यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपण शेती मशागतीची कामे मनरेगाअंतर्गत करण्याची मागणी केली असून हा निर्णय अंमलात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणार आहे. नकाशावरील सर्व शेतरस्ते हे शासन मालकीचे असून ते खुले करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मतदारसंघात प्रशासनाकडून काम केले जात आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी असूनही केवळ शेतरस्ते नसल्याने ऊस अथवा भाजीपाला लागवड करता येत नाही. त्यामुळे या चळवळीचा भाग म्हणून प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवडीकडे वळावे. औसा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील ६८ गावांत २ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी कृषी विभागाकडून काम केले जात आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे कासारशिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, ओम बिरादार, होळकुंदे, बळी पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.
संपूर्ण निधी शेतकऱ्यांसाठी...
माझ्या आयुष्यातील आमदार निधी हा शेतकरी व शेतीविषयी कामावर खर्च होणार आहे. शेत रस्त्यासाठी आमदार निधी खर्च करणारा मी राज्यातील पहिला आमदार आहे. आमदार झाल्यापासून १ कोटी काेविडसाठी आणि उर्वरित ५ कोटी आमदार निधी हा शेत रस्त्यावर खर्च होत असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.