चापोली : कोविडमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून खरिपाची पेरणी केली. उगवलेली कोवळी पिके वन्य प्राणी रात्रीच्या वेळी फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात जागल करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने चापोलीसह परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली. सध्या पिके चांगली उगवली आहेत. त्यामुळे पावसाची गरज आहे. परंतु, १०-१२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उगवेली पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचनाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चापोलीसह परिसरातील डोंगरमाथ्याच्या शेजारील व परिसरातील हरीण, रानडुक्कर, मोर, सायाळ यासह वन्य प्राणी कोवळ्या पिकांवर ताव मारीत आहेत. वन्य जीवांचे कळप पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पीक जगविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रात्रीच्या वेळी वन्य प्राणी पिकात...
दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाहीत. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रभर जागल करून पिकांचे संरक्षण करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.
बंदोबस्त करावा...
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हरणांचे कळप हे वावरातील कोवळी पिके खाऊन नासाडी करीत आहेत. हरीण शेंडे खात असल्याने पुन्हा पीक वर येत नाही. परिणामी, उत्पनात घट येते. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
- धनंजय बालवाड, शेतकरी, चापोली.
पिकांचे अतोनात नुकसान...
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोठी हरणे भरधाव वेगात पिकातून धावत सुटत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतात रात्र जागून काढावी लागत आहे. फटाकड्या, ध्वनी रेकॉर्डिंग क्षेपकाच्या साह्याने वन्य प्राण्यांना हुसकावून लावत आहोत.
- लक्ष्मण तरगुडे, शेतकरी, चापोली.