अनुदानावरील बियाण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक, ई- सेवा केंद्र बंद असल्याने नवा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:27+5:302021-05-19T04:19:27+5:30

चापोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ, कपाशी, ज्वारी, मका आदी ...

Farmers' frustration for subsidized seeds, new question as e-service center is closed | अनुदानावरील बियाण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक, ई- सेवा केंद्र बंद असल्याने नवा प्रश्न

अनुदानावरील बियाण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक, ई- सेवा केंद्र बंद असल्याने नवा प्रश्न

Next

चापोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ, कपाशी, ज्वारी, मका आदी बियाणी ५० टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. प्रस्तावासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी महा - ई- सेवा केंद्र बंद असल्याने आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सध्या ऑनलाईनवर भर दिला. ५० टक्के अनुदानावरील बियाणे मिळविण्यासाठी महाडीबीटीवर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या महा-ई- सेवा केंद्र बंद आहेत. तसेच त्यासाठी ७/१२, ८ अ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, मोबाईल आवश्यक आहे. त्यातील काही कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडचण होत आहे. याशिवाय, ऑनलाईन नोंदणीसाठी शासकीय शुल्कासह ८० रुपये खर्च येत आहे. त्यातही आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असल्यास ओटीपीद्वारे रजिस्ट्रेशन होणार आहे. तर इतरांचे थंबद्वारे करता येणार आहे. एका बॅगवरील ५० टक्के अनुदानासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

७/१२ साठी तलाठी कार्यालयाकडे जावे लागत आहे, तर डिजीटल ७/१२ बऱ्याच तलाठ्यांनी ऑनलाईन अपलोड केला नसल्याने तो निघत नाही. अनुदानासाठी पूर्वीच २०० ते ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत.

लक्की ड्रॉद्वारे बियाणे...

कागदपत्रे जमा करून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही अनुदानासाठी लक्की ड्रॉ निघणार आहे. त्यानंतर बियाणे मिळणार आहे. लॉकडाऊन असताना कृषी विभागाने ऑनलाईनची सक्ती केल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी...

अनुदानावरील बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी आता २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन करावे. एकही शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहू नये.

- भुजंग पवार, तालुका कृषी अधिकारी.

बियाणे बांधावर द्यावे...

शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात सक्ती करून एक प्रकारे त्रास दिला जात आहे. बियाण्याच्या एका बॅगसाठी अनेक नियम, अटींची पूर्तता करावी लागत आहे. तोकड्या अनुदानापेक्षा चांगल्या दर्जाची बियाणे किमान किमतीवर शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून द्यावे. त्यावर किती अनुदान द्यायचे ते द्यावे.

- राजकुमार काचे, शेतकरी, चापोली.

ऑनलाईनमुळे डोकेदुखी...

शासकीय अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी कोविडच्या काळात कृषी विभागाने ऑनलाईन सक्ती केली आहे. तेही स्वतः शेतकऱ्यांना ऑनलाईन सेंटरला प्रत्यक्षात जाऊनच अर्ज भरणा करावा लागत आहे. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

- भागवत शंकरे, शेतकरी, शंकरवाडी.

Web Title: Farmers' frustration for subsidized seeds, new question as e-service center is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.