नागरसोगा : शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात; परंतु, गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाला कमी-जास्त दर मिळत आहे. सध्या दुधाचा दर २२ रुपये प्रतिलिटर आहे. परिणामी, दूध उत्पादक आर्थिक अडचणी सापडले असून पशुपालन करणे कठीण झाले आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा, दापेगाव, तुंगी बु., तुंगी खु., फत्तेपूर, वानवडा, जवळगा, दावतपूर येथील काही सुशिक्षित बेरोजगार व शेतकऱ्यांनी बँक आणि फायनान्सचे कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने २८ रुपये प्रतिलिटर विक्री होणाऱ्या दुधाच्या दरात घसरण होऊन २२ रुपयांपर्यंत भाव आले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनपूर्वी दुधाचा दर प्रतिलिटर ३२ रुपये होता. यंदा मात्र मोठी घट झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याचे दर व चाऱ्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुपालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध उत्पादकांपासून विक्रेते २२ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करून ग्राहकांना ४० रुपये दराने विक्री करतात. सध्या नागरसोगा पशुवैद्यकीय केंद्राअंतर्गत १ हजार ६३७ पशुधन आहे. परिसरातील गावांत शासकीय व खासगी दूध डेअऱ्या आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी दुधाला दर कमी मिळत आहे. अशा परिस्थितीत एका दुधाळ गायीस हिरवा मका व चारा असा एकूण दररोज २५ ते ३० किलो खुराक लागतो. त्यासाठी १५० ते १६० रुपये खर्च येतो. पशुखाद्य दररोज ६ किलो लागते. त्यासाठी १५६ रुपये आणि इतर पावडरसाठी ५० रुपये असा एकूण असा अंदाजे जवळपास ३५६ रुपये खर्च होतो. संकरित गाय दररोज १४ ते १५ लिटर दूध देते. त्यास २२ रु. प्रतिलिटर दराने ३३० रुपये होतात. यात संगोपन, बँक कर्जाच्या व्याजासह हप्ता असतो. या परिसरातील बहुतांश शेतकरी दूध उत्पादनावर अवलंबून असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये भाव द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांतून होत आहे.
शासनाने अनुदान द्यावे
माझ्याकडे सहा संकरित गायी आहेत. त्यांच्यापासून दररोज ८० लिटर दूध मिळते. प्रतिलिटर २२ रुपये दराने डेअरीला देतो. गायीचा चारा व खुराकावर रोख दोन हजार ५० रुपये खर्च येतो. सध्या दुधाचे भाव कमी झाल्याने पदरमोड करावी लागत आहे. हा व्यवसाय तोट्यात सापडला आहे. शासनाने लक्ष देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी येथील दूध उत्पादक शेतकरी बालाजी मेलगर यांनी केली आहे.