उदगीर (जि. लातूर) : शाळेत नववीत असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांच्या मिळालेल्या साथीने, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यूपीएससीचे शिखर गाठल्याची भावना १९७ वा रॅंक मिळविणारे कृष्णा पाटील काेदळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर कृष्णा यांच्या उदगीर येथील निवासस्थानी गर्दी झाली हाेती. शुभेच्छा आणि अभिनंदानाचा वर्षाव सुरु हाेता. यावेळी कृष्णा पाटील म्हणाले, माझ्या यशात आजोबा, काका, आई, आत्या व माझा मित्र निखिल मुसळे यांचे मोलाचे सहकार्य आहे. उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कृष्णा यांच्या वडीलांचे नववीत असताना निधन झाल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांच्या पाठबळावर शिक्षणासाठी कधीही हार पत्करली नाही. आजोबा व्यंकटराव पाटील, काका प्रा.डॉ. अनिल पाटील, काकू अरुणा पाटील व आत्या मनोरमा जाधव पाटील हे सर्वजण शिक्षकी पेशात असल्यामुळे कृष्णावर शैक्षणिक संस्कार घरातूनच मिळाले होते.
दहावीपर्यंत सर्व परिक्षेतच कृष्णा यांनी प्रथम क्रमांक पटकावत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविला. त्यानंतर नांदेड येथील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी मिळवून कृष्णा यांनी २०२० पासून यूपीएससीची तयारी सुरू केली हाेती. ते पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले. दुसऱ्या प्रयत्नात ते तोंडी परीक्षेपर्यंत पोहचले. आता तिसऱ्या प्रयत्नात कृष्णा यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांनी आयएफएसचीही परीक्षा दिली. त्यातही मी यश मिळविणारच असा आत्मविश्वास कृष्णा यांनी ‘लोकमत’शी बोलून दाखविला. कृष्णा यांची बहीण कावेरी ही आयुर्वेदात एम.डी. करीत आहे. आपण स्वच्छ-कार्यक्षम अधिकारी म्हणूनच सेवा करणार असल्याचे कृष्णा म्हणाले.