सद्य:स्थितीत ३६० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यापैकी १०६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या सर्वच रुग्णांच्या फॅमिली डाॅक्टरांचे अर्थात परिसरातील डाॅक्टरांचे अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. सध्या ॲक्टिव्ह असलेल्या ३६० पैकी ३७ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ४ रुग्णांना व्हेंटिलेटर लागत आहे. १२ रुग्ण गंभीर बीआयपी एपी व्हेंटिलेटरवर आहेत. तर ५५ रुग्ण मध्यम ऑक्सिजनवर, मध्यम परंतु, ऑक्सिजनवर नसलेले १२५, आणि सौम्य लक्षणाचे १६४ रुग्ण आहेत. यातील १०६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
होम क्वारंटाईनमध्ये सौम्य लक्षणाच्या रुग्णांना ठेवले जाते. ज्या रुग्णांच्या घरी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांच्या निवासस्थान परिसरात वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर्स आहेत, ज्यांनी की सदर रुग्णावर उपचार करण्यास अंडरटेकिंग दिले आहे, अशाच ठिकाणी होम क्वारंटाईनमध्ये उपचार केले जात आहेत. शहरामध्ये तसेच लातूर महानगरपालिका हद्दीत ज्यांच्याकडे स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा रुग्णांनाच होम क्वारंटाईन विनंतीवरून केले आहे.
दोन आठवड्यानंतर गृहविलगीकरणातील रुग्णांना ऑनलाईन सुटी दिली जाते. परिसरातील डाॅक्टरांच्या अंडरटेकिंग आणि आरोग्य विभागामार्फत दर तीन दिवसाला फोनद्वारे रुग्णांची विचारपूस केली जाते. सदर रुग्णास त्रास असल्यास त्यांना दिलेल्या माहिती पुस्तिकेतील भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर तात्काळ गृहविलगीकरणाच्या ठिकाणी भेटही दिली जाते. मात्र आतापर्यंत अशी गरज एकाही रुग्णाला पडली नसल्याचे सांगण्यात आले.
घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था असलेले १०६ जण क्वारंटाईनमध्ये आहेत. या रुग्णांच्या उपचाराबाबत आमचे नियंत्रण आहे. शिवाय, त्यांच्या परिसरातील फॅमिली डाॅक्टरांचे अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. सौम्य लक्षणे आणि परिसरात डाॅक्टरांची अंडरटेकिंग असल्याशिवाय परवानगी दिली जात नाही.
- डाॅ. एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक