लातूर : नीटमध्ये कमी गुण मिळाले, आता घरच्यांना, मित्रांसमोर काय सांगायचे, असा प्रश्न कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पडतो. अशा प्रश्न लातुरात आत्महत्या केलेल्या दीपककुमारला ही पडला होता. खोट्या यशामागे धावताना मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे वाढीव गुण दर्शविले. असे करणारा तो पहिला विद्यार्थी नव्हता. अनेकांनी पालकांची समजूत निघावी, परीक्षा पुन्हा देण्याची संधी मिळावी, यासाठी असे प्रयोग केल्याचे समुपदेशकांजवळ उघड झाले आहेत. मात्र नैराश्याने दीपककुमारला आत्महत्येपर्यंत नेले.
कृषी महाविद्यालयात बीएस्सी. ॲग्री प्रथम वर्षातील द्वितीय सत्रात राजस्थानचा दीपककुमार शिकत होता. गेल्या शैक्षणिक वर्षात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोट्यातून त्याचा प्रवेश झाला होता. दरम्यान, त्याने नीटची तयारी केली अन् यंदा परीक्षा दिली. त्याला १७० गुण मिळाले आणि १९ जून रोजी त्याने गळफास घेतला. त्यावेळी खोलीत ५४५ गुणांची आणखी एक गुणपत्रिका सापडली होती.
व्हॉटस्ॲप ग्रुपवर कौतुक...दीपककुमारने ५४५ गुण असलेली पीडीएफ मित्रांच्या ग्रुपवर शेअर केली. त्याचे कौतुक झाले. परंतु, अर्ज क्र. १३ अंकी, क्यूआर कोड स्कॅन न होणे या कारणाने त्याचे १७० मार्क सर्वांना समजले. याच नैराश्यातून त्याने गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मित्रांचा जबाब, नेमके काय घडले?पोलिसांनी शनिवारी दीपककुमारच्या मित्रांशी संवाद साधला. पीडीएफ अथवा फोटोशॉप एडिटिंगद्वारे मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करून गुणपत्रिकेत बदल केल्याचा अंदाज आहे. राजस्थान, सिकरमधून बनावट गुणपत्रिका मिळवली, अशी कोणतीही माहिती त्याच्या मित्रांकडे नाही. केवळ अधिक मार्क दाखविणे इतकाच उद्देश ठेऊन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे बदल केलेला दिसतो. त्यामुळे बनावट गुणपत्रिका, रॅकेट किंवा इतर कोणतेही धागेदोरे नाहीत.- संतोष पाटील, पोलिस निरीक्षक.
विद्यार्थ्यांना सामाजिक दबाव, प्रतिष्ठेपासून दूर ठेवादीपककुमार एकटाच नव्हे तर निकालानंतर आठ-दहा विद्यार्थ्यांनी पालकांची समजूत काढावी अथवा रीपीटरसाठी पालकांनी संधी द्यावी, म्हणून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे गुणपत्रिकेत बदल केल्याचे आढळले आहे. पालक, विद्यार्थ्यांचा संवाद उत्तम असेल तर हे घडत नाही. अशी प्रकरणे दुर्मीळ असली तरी त्या विद्यार्थ्यांनाही समजून घेतले पाहिजे. पालकांचा अथवा सामाजिक दबाव, प्रतिष्ठा यापासून विद्यार्थ्यांना अलिप्त ठेवले पाहिजे. समुपदेशनासाठी पालकांबरोबर शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस यांचा पुढाकार गरजेचा आहे.- सचिन बांगड, नीट समुपदेशक