उदगीर शहरात यापूर्वी रेल्वे स्थानकावर मालधक्का होता, मात्र काही कारणास्तव तो बंद पडला हाेता. उदगीरच्या व्यापाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन, उदगीर येथील रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे मालधक्का पूर्ववत व्हावा यासाठी पाठपुरावा केला हाेता. या प्रयत्नांना यश आले आहे. सोमवारी उदगीर रेल्वे स्थानकातून उदगीर शहरातील व्यापाऱ्यांचा सोयाबीन घेऊन पहिली मालगाडी गुजरात राज्यातील गांधीधाम येथे रवाना झाली. यातून शेकडो ट्रक वाहतूक करू शकतील इतके सोयाबीन आणि शेतीमाल हे सुरक्षित पोहोचणार आहे. परिणामी, व्यापाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. उदगीर येथील व्यापाऱ्यांनी रेल्वेचा माल वाहतुकीसाठी वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासन, रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उदगीर येथील व्यापारी सचिन हुडे यांनी सोयाबीनच्या ४४ बोगी मालाची उदगीरहून निर्यात केली. २,६०३ टन माल निर्यात झाला. ५० किलो वजनाच्या ५१ हजार ९७८ बॅग निर्यात झाल्या आहेत. यावेळी व्यवस्थापक प्रकाश धनविजय, दीपक नारनवरे, राजेश कंगाने उपस्थित होते.
दक्षिण मध्य रेल्वेचे उदगीर स्टेशन व्यवस्थापक दीपक जोशी, वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे यांनी यासाठी पुढाकार घेतला.