लातूर : शिराळा येथील माळरानावर साकारलेला चंदनशेतीचा प्रयोग तरुण शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आ. धीरज देशमुख यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला. प्रयोगशील तरुण शेतकरी दीपक शहा यांनी अविरत प्रयत्नातून १२ एकरांतील पडीक जमिनीवरील साकारलेल्या प्रकल्पाला आ. देशमुख यांनी भेट दिली.
यावेळी निवडक गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधताना आ. धीरज देशमुख म्हणाले, शेतीची पार्श्वभूमी नसताना दीपक यांचा प्रयत्न काैतुकास्पद आहे. त्यांनी संगणक क्षेत्रातील उच्चशिक्षण घेतले. नाेकरीही त्याच क्षेत्रातली. परंतु, आपल्या भागात वेगळे काही करून दाखवावे, ही जिद्द त्यांनी बाळगली. गेली साडेतीन वर्षे ते शेतात मुक्कामी राहून चंदनाचा प्रकल्प उभारण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत, असे सांगत आ. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांनी अशा प्रकल्पांना भेटी देऊन, प्रशिक्षण घेऊन प्रयोग करावेत. त्यांना कृषी योजनांचे पाठबळ देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. यावेळी ट्वेंटीवन साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख, रवींद्र काळे, बाळू पाटील, महादेव मांदळे, सीताराम काळे, सुनील काळे, प्रा. निपाणीकर, डाॅ. हरिदास, रंजित भिसे, संभाजी वायाळ, जयचंद्र भिसे, राजेसाहेब सवाई, अनिल पाटील, श्रीकृष्णा काळे, व्यंकटराव काळे, खय्युम टेलर, खंडू पवार, लक्ष्मण इंगळे, भास्कर कांबळे, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर देशमुख, विनोद जाधव, सर्जेराव गव्हाणे, प्रवीण बरकते आदींची उपस्थती होती.
प्रयोगशील शेतकऱ्यांचे गट...
आ. देशमुख म्हणाले, दीपक शहा यांच्यासारख्या तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांचा गट तयार करून वेगवेगळ्या पिकांचा, वनशेतीचा पॅटर्न सर्वांपर्यंत नेता येईल. रोजगाराच्या नवीन संधी आपल्याच गावात निर्माण करता येतील. यासाठी वेगळ्या वाटेने जाणाऱ्या व नवे विश्व उभारणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणू, असेही ते म्हणाले.
पाठबळ मिळाले...
दीपक शहा म्हणाले, आपल्या भागात कमी पाण्यावर, दुष्काळजन्य स्थितीत शेतकरी उभा रहायला पाहिजेत, असे प्रयोग केले पाहिजेत हे ठरवून शेतीकडे वळलो. आ. धीरज देशमुख यांनी भेट देऊन उत्साह वाढविला आणि पाठबळ दिले आहे.
शेती प्रारंभिक अवस्थेत...
प्रकल्प प्रारंभिक अवस्थेत आहे. साधारणत आणखी चार वर्षानंतर चंदन वृक्षाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल. यासंदर्भात दीपक यांनी जर्मन शेफर्ड किंवा आपल्याच परिसरातील पश्मी कारवान श्वान शेतीच्या निगराणीसाठी तैनात करण्याचे नियोजन केले आहे.
शेतातील २ कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याची पाहणी करून आ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.