वांजरखेडा ते अकोला मार्ग : बॅरेजेसपर्यंतचा मार्ग खडतर, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
लातूर : तालुक्यातील वांजरखेडा ते अकोला मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. लातूर-बीड जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या दुरवस्थेकडे कोणी पाहायलाही तयार नाही. वांजरखेडा येथील मुख्य रस्त्यानेच बॅरेजसकडे एक रस्ता जातो. हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खड्ड्यांत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह अकोला, तडोळा ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. खराब रस्त्याची ओरड असतानाही प्रशासनाने मात्र याकडे डोळेझाक केली आहे. वांजरखेडा बॅरेजेसवरून नदीपलीकडे असलेल्या अकोला, तडोळामार्गे अनेकजण अंबाजाेगाईला जाण्यासाठी हा रस्ता वापरतात; तर तेथील तीन ते चार गावांतील वाहनधारक लातूरला येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. नदीकाठी असलेल्या दोन्ही गावांतील नागरिकांना इकडून तिकडे जाताना खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. मागील १५ वर्षांपासून वाहनधारकांची ओरड सुरू असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत आहेत. येथून जात असताना प्रवाशांना जणू जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. शिवाय ऊस वाहतुकीसाठी मोठी अडचण झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर आगळे, विजय आगळे, सुनील कदम, गुणवंत आगळे, जगदीश कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बॅरेजेस रस्त्याची दुरवस्था कायम
वांजरखेडा ते बॅरेजेस रस्ता तब्बल १५ वर्षांपासून खराब झाला आहे. या रस्त्याने मांजरा नदीकाठी असलेल्या गावातील नागरिक, शेतकरी, वाहनधारक प्रवास करतात. अकोला, तडोळा ग्रामस्थांना लातूरला येण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान तर होत आहे; शिवाय प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. रस्त्यावर चढउतार वाढल्याने ऊस वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाला आहे, असे अकोला येथील ज्ञानेश्वर आगळे यांनी सांगितले.