नागरसोगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. औसा तालुक्यात एकूण १०९ गावे असून त्यासाठी ८९ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आहेत.
कोरोनामुळे शहरातील नागरिक गावी परतले आहेत. काेरोनाच्या दुस-या लाटेचा प्रभाव अधिक असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना ग्रामसेवकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक रात्रन् दिवस कार्यरत आहेत. बाधिताच्या घर सील करणे, निर्जंतुकीकरण, बाधिताच्या घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी, त्यांच्या नोंदी ठेवाव्या लागत आहेत. गावातील एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याचा शोध घेऊन विलगीकरणात पाठविणे अशी कामे करावी लागत आहेत.
याशिवाय, ग्रामपंचायत दैनंदिन कामकाज, ग्रामस्थांत जनजागृती करावी लागत आहे. गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष मदत करीत असले तरी गाव पातळीवर सर्वाधिक ताण ग्रामसेवकांवर आहे.
औसा तालुक्यातील एकूण १०९ गावे असून त्यासाठी ७३ ग्रामसेवक व १६ ग्रामविकास अधिकारी आहेत. गेल्या वर्षी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र यंदा बाधित ग्रामसेवकांची संख्या अधिक होती. उपचारानंतर बरे झाल्यानंतर ते कामावर रुजू झाले आहेत.
आतापर्यंत १० जणांना संसर्ग...
ग्रामीण भागात ग्रामसेवक फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्य करीत आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागते. आतापर्यंत तालुक्यातील एकूण १२ ग्रामसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील १० जण कोरोनामुक्त होऊन कामावर रुजू झाले आहेत. दोघांवर उपचार सुरु आहेत. शासनाने ग्रामसेवक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळेत उपचार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी औसा तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद बिराजदार यांनी केली.