दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचा उपक्रम
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला जात असून, विविध शाळांच्या वतीने प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जात आहे. शहरातील महाराष्ट्र विद्यालयात या उपक्रमाला प्रारंभ झाला असून, यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गोविंद शिंदे, अनिल सोमवंशी, सूर्यकांत चव्हाण, अरुण काळे, अब्दुल गालिब शेख, शिक्षक पिचारे, ढोक, आर्य, आदी परिश्रम घेत आहेत.
पोलिसांकडून वाहनांची तपासणी मोहीम
लातूर : शहरात रात्री आठ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील पाच नंबर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, आदी भागांत पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी
लातूर : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत विहीर खोलीकरण, नवीन विंधन विहीर घेणे, गाळ काढणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, आदी कामे केली जाणार आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असून, काही ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राप्त प्रस्तावानुसार टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात पक्ष्यांसाठी येळण्या
लातूर : लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस उपनिरीक्षक माधव लोणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येळण्या बसविल्या आहेत. पक्षिमित्र महेबूब चाचा यांनी येळण्यांचे वितरण केले असून, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात येळण्या बांधण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी माधव लोणेकर, चंद्रकांत केंद्रे, राहुल दरोडे, सचिन पाटील, आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.