उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसापासून भिज पाऊस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्यामुळे रहदारीच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करीत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आहे. मोठी खडी व गिट्टी टाकून दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
अखेर उदगीरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST