ज्यांनी पहिला डोस घेतला; परंतु प्रमाणपत्र निघाले नाही, अशा नागरिकांनी त्या-त्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करून घ्यावी. त्यानंतर त्यांना दुसरा डोस घेता येईल. अनेकांनी पहिला डोस घेऊनही त्यांची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये झाली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. दुसऱ्या डोसची मुदत संपत आल्याने अनेकजण लसीकरण केंद्रावर येत आहेत. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या त्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन अशा लाभार्थ्यांचे लसीकरण करून करून घेण्याबाबत सूचित केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाखांच्या आसपास नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून साडेपाच लाखांच्या पुढे डोस घेतले आहेत. लसीकरणाला जिल्ह्यात वेग आला असून सर्वाधिक लसीकरण ४५ च्या पुढील वयोगटात झाले आहे. शहरात महानगरपालिकाच्या आरोग्य विभागांतर्गत आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून लसीकरणाची संख्या गेल्या आठ दिवसांत गतीने वाढली आहे.
लसीकरणानंतर अशी घ्या काळजी....
लसीकरणानंतर नोंदणीसाठी स्वतःचा मोबाईल द्यावा. जेणेकरून तुमच्या मोबाईलवर संदेश पाहता येईल. लस घेतल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. यामुळे पुढचा दुसरा डोस घेण्यास अडचण येणार नाही. स्वतःचा मोबाईल नसेल तर जवळच्या नातेवाइकाचा मोबाईल नंबर द्यावा. त्यावर आलेल्या मेसेज पाहून प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. या एक-दोन साध्या गोष्टी लक्षात ठेवल्यास दुसरा डोस घेताना अडचणी येणार नाहीत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा...
ज्यांनी पहिला डोस घेतला; परंतु प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी ज्याठिकाणी लस घेतली आहे त्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांच्याकडे नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे व दुसरा डोस घ्यावा.
- डॉ़ गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर.