लातूर : केंद्रामध्ये जैव इंधनाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेच्यावतीने पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. पेट्रोलियम प्रदूषणकारी उपाय, तोटा सोसून अतिरिक्त धान्य उत्पादन, शेती उत्पादन व उपाय, इथेनॉल निर्मितीचे राजपत्र, जैव इंधन इथेनॉल निर्मितीचे धोरण, इथेनॉल उत्पादन धोरणाने मद्याला पायबंद आदींबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र जैव इंधन मंत्रालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी या मंत्रालयाची स्थापना होणे काळाची गरज आहे. २०२१-२२ वर्षात हे मंत्रालय स्थापित व्हावे. देश विकासाचे अपूर्ण राहिलेले आणि सर्वांग परिपूर्ण कार्य आपल्या हातून व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनावर महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष सुजाता देसाई, प्रसार प्रमुख बाळ कालेकर, संस्थापक राज्याध्यक्ष श्यामराव देसाई यांची नावे आहेत.
‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ नाविन्यपूर्ण उपक्रम
लातूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी)चे कुलगुरु अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून ‘हरित परिसर-सुंदर परिसर’ ही चळवळ मागील तीन वर्षांपासून राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि. १ ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या कृषी सप्ताहानिमित्त ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. या अनुषंगाने लातूरच्या कृषी महाविद्यालयात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी डॉ. ए. पी. सूर्यवंशी, वसतिगृह अधिक्षिका प्रा. ममता पतंगे, मीना साठे व उपक्रमातील विद्यार्थी सहभागी झाले होते.