जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व रेणापूर तालुक्यांतील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, एमआयडीसीचे अधिकारी महेश कुमार मेघमाळे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यात शासकीय योजनांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला जातो, तो शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. जिल्ह्यात सर्व शासकीय योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, त्यासाठी यंत्रणाप्रमुखाने बारकाईने लक्ष ठेवावे व जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर मंजूर असून तेथील इमारतीचे बांधकाम होण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे व हे सेंटर त्वरित सुरू करून त्या भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणे ही विभागप्रमुख म्हणून जबाबदारी असल्याचे त्यांनी सूचित केले.