देवणी पोलिसांनी सांगितले, लेकीच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून परत जात असताना वयोवृद्ध महिला सोमवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास वलांडी बसस्थानकावर उदगीरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होती. तेव्हा तिच्या गळ्यातील दीड तोळ्याची मण्याची चेन (किंमत ४५ हजार) चोरीस गेली. या घटनेची माहिती मिळताच वलांडी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे व पोलीस कर्मचारी राजपाल साळुंखे यांनी काही वेळातच स्थानकात येऊन पाच महिला चोरट्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिने आढळून आले नाही. याप्रकरणी सुशीलाबाई माधवराव शिराळे (रा. शेकापूरवाडी, ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात बबीता सुरेश उपाध्ये, मीराबाई प्रकाश कांबळे, पूनम युवराज उपाध्ये (सर्व जण रा. उदगीर), गोदावरी राजू कांबळे, छाया राजेश उपाध्ये (रा. लाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड हे करीत आहेत.
वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST