बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर या धम्म संस्थेद्वारे श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने महाविहार धम्म संस्कार केंद्र, सातकर्णीनगर, रामेगाव येथे धम्मदेसना कार्यक्रमात भन्तेजी बोलत होते. भन्ते पय्यानंद म्हणाले, बुद्ध धम्माची शिकवण मनुष्याला नीतिमान होण्यासाठी आहे. समाजातील राजापासून ते रंकापर्यंत सर्वांनी नीतिमान होणे हे अनिवार्य आहे. नीतिमान होण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात सदाचार अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे. व्यवहारात सदाचारच हा आपला कुशल सहकारी आहे. राग, क्रोध, तिरस्कार, मत्सर, घृणा आणि अहंकार हे मानवी मनाचे दुर्गुणरूपी मळ आहेत. मलिन मळ हे मानवी जीवनाचा अधोगतीचा पाया आहे. त्यामुळे अहंकार आणि इतर दुर्गुण आणि विकार जीवनातून हद्दपार करणे हे सुखी जीवनाचे तंत्र आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रा. श्रीहरी तलवारे, मुख्याध्यापक उत्तम दोरवे, भरत कांबळे, पांडुरंग अंबुलगेकर, सुधाकर कांबळे, परमेश्वर आदमाने, डॉ. अरुण कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले, तर आभार डॉ. संजय गवई यांनी मानले.
अहंकार दुर्गुणाने मानवाचे अध:पतन होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST